महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरीत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भूमीपूजन

   रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद पतसंस्था माझ्या मतदारसंघात असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या कार्याची उंची व आदर्श सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करावा तितका कमी आहे. आता पाच मजली इमारत उभारून संस्था नवी उंची गाठत आहे, हे निश्चितच प्रेरणादायक आहे. संपूर्ण महाराष्ट्र फिरताना सहकार क्षेत्रातील ताकद आणि योगदान नेहमीच प्रकर्षाने जाणवते. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि संस्थेच्या यशासाठी अशा पुढाकारांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषामंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.

      स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या आठवडा बाजार नाका येथील प्रशस्त वास्तूचे भूमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून रा. स्व. संघाचे विभाग संघचालक दत्ताराम सोलकर, पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, उपाध्यक्ष माधव गोगटे, संतोष प्रभू, जयप्रकाश पाखरे, राजेंद्र सावंत, अजित रानडे, प्रसाद जोशी आदी उपस्थित होते. मंत्री उदय सामंत आणि श्री. सोलकर यांचा सन्मान ॲड. पटवर्धन यांनी केला.
      याप्रसंगी ॲड. पटवर्धन म्हणाले की, ३४ वर्षानंतर आज संस्थेचे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र आहे. नवीन इमारतीमुळे संस्था आणखी प्रगतीशिल होणार आहे. सहकार क्षेत्र एकमेकावर अवलंबून आहे. रत्नागिरीचे अर्थकारण गतिमान करण्यात संस्थेने योगदान दिले आहे. पाच मजली अद्ययावत इमारत दोन वर्षांत उभी राहणार आहे. दोन वर्षांत पतसंस्थेचे सुसज्ज कार्यालय सर्वांसाठी खुले होईल. सहकार पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे. राज्यातील सर्व पतसंस्थांच्या काही निवडक प्रश्नांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा. श्री. सोलकर यांनी सांगितले की, आर्थिक विषयांत सजग नसणारा आणि उद्योजकतेबाबतीत अल्पसंतुष्ट असणाऱ्या वर्ग येथे मोठा प्रमाणात आहे. या सर्व वातावरणारत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा वटवृक्ष झाला आहे. उपाध्यक्ष माधव बापट यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक मोहन बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी म्हणून काही शाळांना आर्थिक मदत संस्थाचालकांकडे सुपूर्द करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!