रोहित शर्मा सरावासाठी पुन्हा मुंबई टीम मध्ये
गेल्या काही काळापासून गमावलेली लय परत मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माने मुंबई रणजी क्रिकेट संघाच्या मंगळवारी झालेल्या सराव सत्रात हजेरी लावली. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सत्रात रोहितने मुंबईचा कर्णधार आणि भारतीय संघातील माजी सहकारी अजिंक्य रहाणे याच्या साथीने बराच वेळ लाल चेंडूविरुद्ध फलंदाजी केली.
३७ वर्षीय रोहितसाठी गेले काही आठवडे विसरण्याजोगे ठरले आहेत. नुकत्याच बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी झालेल्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांत मिळून रोहितला केवळ ३१ धावा करता आल्या. अपत्यप्राप्ती झाल्याने त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन झाल्यावर त्याला मधल्या फळीत खेळावे लागले. मात्र, सलग दोन सामन्यांतील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने या मालिकेतील मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीत सलामीला परतण्याचा निर्णय घेतला परंतु त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे सिडनी येथे झालेल्या निर्णायक पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याने स्वत:हून संघाबाहेर राहणे पसंत केले.
रोहितची कसोटी कारकीर्द आता धोक्यात असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीचे रविवारी झालेल्या बैठकीत अवलोकन करण्यात आले. या बैठकीत रोहित, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, ‘बीसीसीआय’चे नवनियुक्त सचिव देवजित सैकिया उपस्थित होते. आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहितकडेच राहणे अपेक्षित आहे. त्याआधी लय मिळविण्याचा रोहितचा प्रयत्न आहे.
रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला २३ जानेवारीपासून सुरुवात होणार असून मुंबईसमोर जम्मू आणि काश्मीर संघाचे आव्हान असेल. हा सामना ‘एमसीए’-‘बीकेसी’ अकादमीच्या मैदानावर होणार आहे. बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात रोहित खेळणार का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रोहितने मुंबईसाठी आपला अखेरचा रणजी सामना २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता.
