सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात टेक टॉक २०२५ या कार्यशाळेच्या सिरीजचे उद्घाटन
अभियांत्रिकी शाखांच्या विषयांमधील भिंती दूर करणे हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली! असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय धांडे यांनी केले. रोटरी क्लब, पुणे व तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी टेक टॉक २०२५ या कार्यशाळेच्या सिरीजच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ एकाच तंत्रज्ञानाचा नव्हे, तर विविध तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्याची संधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यापक अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच नाही तर आंतरतांत्रिक कौशल्ये विकसित करण्याची संधी देतात. यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेत भर पडते, व्यावसायिकता वाढते आणि उद्योगांच्या बदलत्या मागण्यांसाठी ते अधिक सुसज्ज होतात. विविध तंत्रज्ञान एकाच अभ्यासक्रमामध्ये शिकण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारक पाऊल ठरू शकते. कार्यशाळा किंवा अभ्यासक्रम नव्या पिढीला तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनवतात आणि उद्योगांसाठी आवश्यक असलेली बहुआयामी मनुष्यबळाची गरज पूर्ण करतात. एकत्रित तंत्रज्ञान अभ्यास हा तंत्रज्ञानातील नवीन क्रांतीकडे नेणारा मार्ग आहे, जो विद्यार्थ्यांना आणि समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.
हायड्रोजन ग्रीन एनर्जी ही भविष्यातील स्वच्छ, शाश्वत आणि प्रभावी ऊर्जा स्रोत म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हायड्रोजन ग्रीन एनर्जीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून ग्रीन एनर्जी तंत्रज्ञानाचा व पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकास साधण्यासाठी क्रांतिकारी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे तिच्या उपयोगासाठी सरकार, उद्योग क्षेत्र आणि संशोधक यांनी एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
ज्ञान शाखांमधील एकत्रीकरणाचा उपयोग मनुष्य जीवन अधिक समृद्ध करणार आहे. ज्ञान आणि विद्वत्ता यात फरक आहे. माहिती आणि ज्ञान सतत प्रभावी असतं परंतु त्यातून तयार होणारी विद्वत्ता ही खूप महत्त्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण परीक्षण मनुष्याला करता आला पाहिजे असे प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.आजच्या युगात तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सायन्स, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये रोज नवनवीन शोध व तंत्रज्ञान विकसित होत आहे. या वेगवान बदलांचा सामना करण्यासाठी केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे ठरत नाही. विद्यार्थ्यांना उद्योगातील मागण्यांनुसार अद्ययावत तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आजची कार्यशाळा महत्वाची आहे असे मत तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी यावेळी मांडले.
कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक तसेच कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे तांत्रिक विषयांचे तज्ञ प्राध्यापक हजर होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील नवनवीन प्रगतीची ओळख करून देणे तसेच त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना उद्योग जगतातील भविष्यासाठी तयार करणे हा आहे. अभियांत्रिकी शिक्षणात तांत्रिक प्रगती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी टेक टॉक२०२५ सिरीज निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
