महत्त्वाच्या बातम्या

लक्ष्मी रस्त्यावर ‘मुंढे स्टाइल’चा दणका; व्यंगचित्रातून भेसळ खोरांना थेट संदेश

पुणे: गणेशोत्सवाच्या आनंदी व चैतन्यमय वातावरणात पुण्यातील ऐतिहासिक लक्ष्मी रस्त्यावर यंदा एका अत्यंत वेगळ्या आणि लक्षवेधी सामाजिक संदेशाने अवघ्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या धडाकेबाज कार्यशैली, कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा साठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे असलेले अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेचा वापर करत एका प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाने थेट खाद्य पदार्थांमधील भेसळ खोरांना कडक इशारा दिला आहे. धार्मिक अनुष्ठाना सोबतच समाज प्रबोधनाचा एक अतिशय प्रभावी आदर्श या मंडळाने घालून दिल्यामुळे सध्या संपूर्ण शहरात या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

       पुण्यातील प्रसिद्ध ‘वीर हनुमान मित्र मंडळाने’ यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणपती रथाच्या सजावटीसाठी एक हटके आणि समाजोपयोगी संकल्पना राबवली आहे. या आकर्षक रथावर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे एक बोलके व्यंगचित्र साकारण्यात आले असून, त्यांच्या हातामध्ये भिंग दाखवून बाजारातील खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेवर आणि शुद्धतेवर कठोर नजर ठेवण्याचा संदेश देण्यात आला आहे. या व्यंगचित्राखाली ‘मला श्रींच्या नैवेद्यातही अजिबात भेसळ चालणार नाही’ असा अत्यंत सक्त आणि स्पष्ट संदेश झळकवण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला विविध प्रकारच्या मिठाई, खवा, पनीर, दूध आणि पारंपरिक मोदकांचा मोठ्या प्रमाणावर नैवेद्य अर्पण केला जातो. सणासुदीच्या या दिवसांत खाद्य पदार्थांची मागणी अचानक कैक पटीने वाढल्याने बाजारात अशुद्ध व भेसळयुक्त अन्नपदार्थ विकले जाण्याचा मोठा धोका असतो. याच गंभीर सामाजिक समस्येवर बोट ठेवत गणेशभक्तांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अन्नाच्या शुद्धते बाबत जागरूक करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या मंडळाने केले आहे.

       गेल्या काही काळापासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए प्रशासनाने राज्यभरात खाद्य पदार्थां मधील भेसळ, तसेच मुदतबाह्य आणि बनावट उत्पादनां विरोधात अत्यंत आक्रमक आणि धडक कारवायांचा बडगा उगारला आहे. त्यांच्या याच निर्भय आणि जनहितैषी कामाचा संदर्भ घेत गणेशोत्सवा सारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रबोधन घडवून आणण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद मानला जात आहे. लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ होणारा हा अनोखा गणपती रथ आणि त्यावरील तुकाराम मुंढेंचे व्यंगचित्र पाहण्यासाठी व वाचण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. या सृजनशील उपक्रमामुळे केवळ धार्मिक सोहळा साजरा न करता, आरोग्य विषयक सुरक्षितता आणि शुद्ध नैवेद्याचा संदेश घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे काम या मंडळाने केले असून, पुणे पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या धाडसी अधिकाऱ्यांप्रती नागरिकां मधील आदर या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!