महत्त्वाच्या बातम्या

वंदे मातरम् मुद्द्यावरून राजनाथ सिंहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण स्वरूपातील सादरीकरणावरून राष्ट्रीय राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमां मध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोनच कडवी गाण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने घेतला आहे, ज्यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचा हा निर्णय अत्यंत घटना विरोधी, निंदनीय आणि पक्षाची घातक मानसिकता दर्शवणारा असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

     काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत १९३७ मधील ऐतिहासिक अधिवेशनाचा संदर्भ देत, पक्षाच्या सर्व कार्यक्रमांत ‘वंदे मातरम्’ची केवळ दोनच कडवी गाण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला. ‘वंदे मातरम्’ सारख्या राष्ट्रगीताचा आणि ऐतिहासिक गीताचा पूर्ण सन्मान करण्यास काँग्रेसने दिलेला अधिकृत नकार हा घटनात्मक दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १९३७ मध्ये मुस्लिम लीगच्या दबावाखाली येऊन काँग्रेसने अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता, ज्याचे दुष्परिणाम देशाला फाळणीच्या रूपाने सहन करावे लागले. आता पुन्हा एकदा पक्ष त्याच कट्टरतावादा समोर शरणागती पत्करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. कायद्याचे पालन करण्यास नकार देणाऱ्या आणि राष्ट्रीय मूल्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या देशभक्तीवर व संविधानाप्रतिक असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असेही ते म्हणाले.

        कपिल सिब्बल यांचे भाजपला प्रत्युत्तर काँग्रेसच्या या निर्णयावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच, राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. पूर्ण ‘वंदे मातरम्’ न गाणारे किंवा या मुद्यावरून काँग्रेसला देश विरोधी ठरवणारे नेते स्वतः कधी या नियमांचे तंतोतंत पालन करतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असताना आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले होते का, असा थेट प्रश्न उपस्थित करत सिब्बल यांनी या वादात भर घातली. या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे ‘वंदे मातरम्’च्या कडव्यांच्या संख्येवरून सुरू असलेला हा वाद आगामी काळात आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!