विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन अभाविप शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची भेट
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.हसन मुश्रीफ व आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चालणारे आर्थिक गैरव्यवहार, खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड (छात्रवृत्ती) देण्यात यावी, पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या समस्या, रखडलेली आरोग्यभरती अशा विविध विषयांना घेऊन निवेदन देण्यात आले.
राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक गैरव्यवहार आढळून आले आहे, यामध्ये अनुशेष परीक्षांसाठी अधिकचे शुल्क घेणे,अवैधरित्या दंड वसुली करणे असे प्रकार निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अभाविपच्या ५९ व्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड (छात्रवृत्ती) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, जागेवरील प्रवेश फेरीद्वारे (स्पॉट राऊंड) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी तसेच अनेक वर्षांपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्यांना वर्ग करण्यात यावी अशी मागणी अभाविपच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली.
पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अभाविपने केलेल्या आंदोलनानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला परंतु अद्यापही या विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सुटलेल्या नाही. या समस्यांच्या बाबतीत देखील निवेदनात पाठपुरावा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील रखडलेली आरोग्य विभागातील पदांची भरती तत्काळ करण्यात यावी, राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी योजना आरोग्य विभागाने सुरू करावी,महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन असणे आरोग्य विभागाने अनिवार्य करावे, पॅरामेडिकल मध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश सेवा प्रवेश नियमांमध्ये करून शासकीय पदांसाठी या विद्यार्थ्यांना पात्र करण्यात यावे अशा मागण्या अभाविपच्या शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. अभाविप च्या या शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, सहमंत्री आदित्य मुस्के, ओम मालुंजकर, मेघा शिरगावे, प्रांत जिज्ञासा संयोजक रचीत गादेकर, पॅरामेडिकलचे विद्यार्थी महेंद्र भोये यांचा समावेश होता.
“वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग या राज्याच्या पाठीचा कणा आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या वैद्यकीय विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अभाविप या समस्यांना घेऊन सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या निमित्ताने, नियमबाह्य दंड वसुलीच्या माध्यमातून चालणारे आर्थिक गैरव्यवहार हे तत्काळ थांबवले पाहिजे, खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय विद्यार्थ्यांप्रमाणेच स्टायपेंड (छात्रवृत्ती) ही मिळाली पाहिजे. अभाविपच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा हा सुरू राहील. गरज पडल्यास या समस्या सोडविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही”.
