भजनी मंडळ हा समाजाचा महामेरू आहे -ह.भ.प. विश्वनाथ गरगडे
सातारा : आजच्या काळात धर्म संस्कृती जोपासण्याचे काम वारकरी संप्रदाय व भजनी मंडळ करीत असून वारकरी हा समाजाचा आधारस्तंभ तर भजनी मंडळ हे समाजाचा महामेरू व कणा आहे. असे प्रतिपादन रामकृष्ण हरी वारकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गरगडे यांनी केले.
विकासनगर खेड येथील बिरदेव मंदिरात सातारा तालुका भजनी मंडळ शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ.अरूणाताई बर्गे, वारकरी संघाचे जिल्हाध्यक्ष अरूणराव कट्टे, शंकरराव गोळे,प्रकाश ओंबासे, अश्विनी क्षीरसागर, हेमंत हास्पे,अशोक महाराज पोळ, नंदकुमार पवार, बाबुराव घागरे, चंद्रकांत घोरपडे, गणपतराव गोळे, अमृत रायबोले, रामदास सुतार, अनिल दवंडे, शंकर कोळपे, खेड ग्रामपंचायतीच्या सदस्या चंद्रभागा माने, प्रियांका सपकाळ,सुमन गंगणे, शामराव कोळपे, विनोद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, धर्म ग्रंथानी समाजाला दिशा दिली तर धर्म संस्कृती जोपासण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. परंतु आज भजनी मंडळांची दशा होत चालली असून या मंडळांना संघटीत करणे काळाची गरज आहे. पांडुरंगाच्या जागरणाचे काम करणारी भजनी मंडळे समाजाला ‘वगळातून व्यवस्थेकडे’ नेहण्याचे काम करतात. असे सांगून ते म्हणाले, साधुसंतांच्या विचारांचे राज्य वारकरीच निर्माण करू शकत असून विनामूल्य सेवा करणारी भजनी मंडळे आणि वारकऱ्यांना शासनदरबारी मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्या मानधनासह अन्य सेवा,सुविधांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात.
डॉ.अरूणाताई बर्गे म्हणाल्या, आमच्या घराण्याला सांप्रदायिक विचारांचा वारसा असून ना.महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व भजनी मंडळाला सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी ह.भ.प.जगन्नाथ शिंदे, अशोक महाराज पोळ, शंकरराव गोळे, प्रफुल्ल डोंबाळे, स्वप्निल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विकासनगर परिसरातून टाळ, मृदुंगाच्या गजरात भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली. प्रास्ताविक श्रीरंग पाटील यांनी केले. सुत्रसंचलन खेड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय कदम यांनी केले.
या कार्यक्रमास विकासनगर, खेड, चाहूर, पिरवाडी, वनवासवाडी, कृष्णानगर, संगमनगर, संगममाहुली, शाहूनगर, संभाजीनगर, गोळीबार मैदान, यासह सातारा तालुक्यातील ४८ भजनी मंडळाचे पदाधिकारी, वारकरी,भाविक उपस्थित होते. अभय क्षीरसागर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
