शिंपी समाजाच्यावतीने वैभव पोरे यांच्या कार्याचा गौरव
म्हसवड ता.माण येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षक वैभव पोरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा गौरव शिंपी समाजाच्यावतीने व पोरे परिवाराच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते मानपत्र , सन्मानचिन्ह ,श्री संत नामदेव महाराज पगडी , शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.
म्हसवड ता.माण येथे शिंपी समाज पोरे कुटुंबियांचा स्नेह मिळावा आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे,नामदेव समाज परिषदेचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे,राज्याध्यक्ष संजय नेवासकर, पंढरपूर केशवराज संस्थचे अध्यक्ष बाळ आंबेकर, म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी,नामदेव समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पोरे, सौ.सुवर्णा पोरे,वैभव पोरे,वृषाली तृपसाखरे, उषाताई पोरे,चंद्रकांत पोरे,देविदास पोेरे,मनोज पोरे,रविकांत पोरे, शकुंतता आप्पासाहेब पोेरे, अश्विनी पोरे, सुनीलकुमार पोरे आदी पोरे बांधव उपस्थित होते.
वैभव पोरे हे ज्ञानदानाच्या क्षेत्रात कार्यरत असून ज्ञानाधिष्ठीत समाज व कल्याणकारी व्यवस्थेची संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी कार्यात स्वतःला सर्वस्वी झोकून दिले आहे.त्यांची म्हसवड ही जन्मभूमी असली तरी त्यांची कर्मभूमी पुणे आहे. मात्र ते आपल्या जन्मभूमीतही शैक्षणिक क्रांती करण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करून मदत देत आपल्या मातीशी रूणानुबंध कायम ठेवत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना मुलभूत जीवनावश्यक गरजा देण्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यात झोकून दिले आहे.सन २००५ पासून रोटरी क्लब व कॅनडा येथील स्कॉ संस्थेच्या सहाय्याने व योगदानातून गरजू विद्यार्थ्यांसाठी स्लीपींग कीट व स्कूल कीट वाटप कार्यक्रमासाठी राज्य समन्वयक पदावर काम करत असताना आजअखेर राज्यातील ८८ हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना सुमारे ५३ कोटी रुपये किंमतींचे साहित्य वितरण केले आहे.
शालेय पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मितीमध्ये राज्यस्तरावर बालभारती व SCERT पुणे येथे सन २००० ते आज अखेर समिती सदस्य, तज मार्गदर्शक, सुलभक, शिक्षणतज्ञ म्हणून काम करत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.अनेक शाळांमध्ये स्वच्छ पेयजल युनिट, संगणक कक्ष, शौचालये, विज्ञान प्रयोगशाळा, तसेच दिव्यांगांसाठी साहित्य साधने वाटप, उच्च शिक्षणासाठी गरजू मुलामुलींना शिष्यवृत्ती वाटप, ५००हून अधिक शाळांना ई-लर्निंग संच व संगणक संचांचे वाटप, गरजू मुलींना सायकल वाटप, ३० हजार मुलीसाठी स्वेला लसीकरण, अनाथालये व आश्रमशाळा यांना अन्नधान्य साहित्य वाटप तसेच मोडकळीस आलेल्या शालेय ईमारती शालेय शौचालये यांची नव्याने पूनर्बाधणी करून सुमारे १०० शाळांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.गावोगावी नेत्रतपासणी शिबीर आयोजित करून संदर्भित सुमारे ८०० रुग्णांच्या मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून दिलेल्या आहेत ग्रामीण रुग्णालये व कोवीड सेंटर यांना अत्यावश्यक रुग्ण साहित्याची (बेड, ऑक्सीजन मशिन, डायलिसीस मशिन इ पुणे व सातारा जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रे) मदत करून रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत.आपल्या या सर्व शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून कॅनडा येथील स्कॉ संस्थेने तसेच महाराष्ट्र शासनाने मा मुख्यमंत्री महोदयांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीचाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.तसेच आदी विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित केल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पुणे,म्हसवड येथील मान्यवर,ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या समाजाने कार्याचा केलेला गौरव अभिमानास्पद….
सामाजिक,शैक्षणिक कार्य करत असताना आज पर्यंत केंद्र,राज्यस्तरावर मा.मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार स्विकारले.परंतू आपल्या जन्मभूमीत आपल्या समाजाच्यावतीने,आपल्या लोकांनी आपल्या ग्रामविकासमंत्र्यांच्या हस्ते केलेला कार्याचा गौरव माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.तो मी कधीच विसरू शकत नाही.
– वैभव पोरे ,म्हसवड ता.माण
