महत्त्वाच्या बातम्या

व्हिएतनाम दौऱ्यासाठी ऋतुराज कदमची निवड; महाराष्ट्रातून ठरला एकमेव एनसीसी विद्यार्थी

दहिवडी: माण तालुक्यातील मलवडी गावचा सुपुत्र आणि होतकरू तरुण ऋतुराज रवींद्र कदम याची अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘युवा आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत’ (Youth Exchange Programme – YEP) व्हिएतनाम दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड होणारा तो संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव एनसीसी विद्यार्थी ठरला आहे. आगामी १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान व्हिएतनाम येथे होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

ऋतुराजचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या दौऱ्यासाठीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण आणि बहुस्तरीय होती. सुरुवातीला कोल्हापूर, मुंबई ‘अ’, मुंबई ‘ब’, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या महाराष्ट्रातील सात संचालनालयांतर्गत झालेल्या ‘आंतर संचालनालय’ स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. यादरम्यान, एनसीसीच्या नेव्ही विंगमधून त्याची महाराष्ट्राचा ‘बेस्ट कॅडेट‘ म्हणून निवड करण्यात आली होती.

भारतातील १७ एनसीसी निर्देशालयांमधून लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे मिळून केवळ ५१ विद्यार्थी दिल्ली येथील अखिल भारतीय सर्वोत्कृष्ट छात्र स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. यामध्ये तिन्ही दलांच्या विद्यार्थ्यांचे एकूण ९०० गुणांच्या कठोर बहुस्तरीय मूल्यांकनाद्वारे परीक्षण झाले. यात लेखी परीक्षा, कवायत चाचणी (ड्रिल), फायरिंग टेस्ट, व्यक्तिमत्त्व व मुलाखत, तसेच सांस्कृतिक आणि अतिरिक्त उपक्रमांचा समावेश होता. या सर्व कठीण चाचण्या पार पाडत ऋतुराज कदम याने नौदलाचे कास्य पदक (Bronze Medal) पटकावले.

दिल्ली येथे महिनाभर चाललेल्या या विशेष शिबिरा दरम्यान मध्यवर्ती मूल्य मापकांनी विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्व चाचणी, मुलाखती, संचलनातील अचूकता आणि संवाद कौशल्य या निकषांवर पुन्हा मूल्यमापन केले. या सर्व अत्यंत स्पर्धात्मक चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवल्यामुळेच त्याची व्हिएतनाम दौऱ्यासाठी अंतिम निवड झाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतातून या कार्यक्रमासाठी केवळ १३ जणांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये १२ जण लष्कराचे तर ऋतुराज हा एकमेव नौदलाचा विद्यार्थी आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मलवडीसह संपूर्ण माण तालुक्यात आणि राजकीय व शैक्षणिक वर्तुळातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!