महत्त्वाच्या बातम्या

शिक्षण-रोजगाराचा मुद्दा तापला; अभिजीत दिपकेंचा सरकारला मोठ्या आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत, कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. समाजातील तरुण मुलांना योग्य वेळी दर्जेदार शिक्षण आणि हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला असता, तर जरांगे पाटील यांच्या सारख्या नेत्यांवर उपोषणाचे कठोर हत्यार उपसण्याची वेळच आली असती का, असा थेट आणि खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

         मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसें दिवस अधिक तीव्र होत चालला असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील अचल आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले की, जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती किंवा समाज प्रमुख आंदोलनाचा मार्ग स्वीकारतो, तेव्हा तो त्यांच्यासाठी अखेरचा पर्याय असतो. सरकारने यावर कोणताही विलंब न लावता तातडीने जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधावा आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन लांबवून प्रश्न अधिक गुंतागुंतीचा करण्यापेक्षा सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जरांगे पाटील समाजाच्या भवितव्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी लढा देत असून त्यांच्या मागण्या अन्यायकारक नसल्याचे स्पष्ट करत, आपण लवकरच अंतरवाली सराटी येथे जाऊन प्रत्यक्ष त्यांची भेट घेणार असल्याची घोषणाही दिपके यांनी केली.

     यावेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, परीक्षांमधील घोळ आणि विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे यांसारख्या गंभीर प्रश्नांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकारकडून केवळ न्यायालयाचा धाक दाखवून किंवा कायदेशीर बाबी पुढे करून वेळ मारून नेली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

      राज्यातील विविध समाज घटकांकडून आणि विद्यार्थ्यां कडून सातत्याने आंदोलने पुकारली जात असल्याचा दाखला देत अभिजीत दिपके यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. आगामी काळात जर विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनापेक्षाही कैक पटीने मोठे आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासोबतच अन्य सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवरून सरकार विरोधात रोष वाढत चालल्याने, आगामी काळात राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!