महत्त्वाच्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरातच्या जामिनावर आज सुनावणी; उज्ज्वल निकम मांडणार सरकारची बाजू

नाशिक: अध्यात्म आणि दैवी शक्तीची बतावणी करून महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक करणाऱ्या कुख्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाला आज अत्यंत महत्त्वपूर्ण वळण मिळणार आहे. गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून कारागृहात बंदिस्त असलेल्या अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या बहुचर्चित प्रकरणात राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम आज पहिल्यांदाच सरकार पक्षाची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

        मार्च महिन्यात अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्याच्या विरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यातील तब्बल १२ गुन्ह्यांचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला होता. दैवीशक्तीची भीती दाखवून आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन महिलांवर अत्याचार करणाऱ्या खरातचे अनेक संतापजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.

       आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान तपास यंत्रणेकडून भोंदूबाबा विरुद्ध गोळा करण्यात आलेले भक्कम पुरावे आणि साक्षीदारांची सविस्तर माहिती न्यायालया समोर सादर केली जाणार आहे. खरातच्या जामीन अर्जाला सरकार पक्षाकडून तीव्र विरोध केला जाण्याची दाट शक्यता असून, ॲड. उज्ज्वल निकम यांच्या कायदेशीर युक्तिवादावर सर्वांचे डोळे लागले आहेत. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालय जामीन अर्जावर काय निर्णय देते, याकडे पीडित महिलांसह संपूर्ण नाशिककरांचे लक्ष वेधले गेले आहे.

       दरम्यान, तुरुंगात कोठडीत असताना अशोक खरात याच्या काही अजब आणि विचित्र हालचाली समोर आल्या आहेत. कोठडीत बसून सतत मंत्रजप करणे, स्वतःशीच काहीतरी पुटपुटणे आणि आपल्या कृत्यांचे दैवी विधी म्हणून अजब समर्थन करणे, याद्वारे तो पोलीस यंत्रणेची आणि न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, एसआयटी आणि नाशिक पोलिसांनी त्याच्या विरुद्धचा तपासाचा फास अत्यंत मजबूत केला असून, आजच्या न्यायलयीन कारवाईत काय निष्पन्न होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!