शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक नोंदणी करावी तहसीलदार शामला खोत-पाटील
शिराळा : संपूर्ण राज्यामध्ये कृषी क्षेत्रात डिजिटल सेवेचा वापर करून, शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने वापर व शेतकऱ्यांना परिणामकारकरित्या लाभ देता यावा याकरिता केंद्र शासनाची अग्रीस्टॅक योजना राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, अग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक निर्मितीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया गतिमान करताना, नागरी सुविधा केंद्रांच्या सहकार्याने शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करायचा आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ या प्रकल्पामुळे सुलभ, पारदर्शक पद्धतीने आणि वेळेवर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्टा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. उच्च गुणवत्तेचा डेटा व अग्रीस्टॅकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवनवीन कल्पना प्राप्त होणार आहेत.
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आधारकार्ड, मोबाइल नंबर, बँक खाते नंबर घेऊन आपापल्या गावांमधील नागरी सुविधा केंद्रे, महा-ई-सेवा केंद्रांमार्फत अग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही तहसीलदार खोत-पाटील यांनी केले आहे.
