संगमनगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन फुटल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास
संगमनगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसापूर्वी फुटली असून सदर पाईपलाईन मधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. सातारा लातूर महामार्गावर कृष्णा नगर येथे एमआयडीसी ला जाणाऱ्या रस्त्या जवळच पाईपलाईन फुटल्यामुळे चिखलाचा राडा झाला आहे. सातारा कोरेगाव रस्त्यावर तसेच एमआयडीसी रस्त्यावर सुद्धा सदरचा राडा पसरला असल्यामुळे वाहने घसरत असून विशेषतः महिलांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मेघा इंजीनियरिंग पुणे यांनी या भागात रस्त्याची कामे अर्धवट केलेली असून त्यातील काही ठिकाणे अत्यंत धोक्याची बनली आहेत. त्यातच या संपूर्ण रस्त्यावर अनाधिकृत भाजी मंडई भरली जाते. विशेषतः संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सदर ठिकाणापासून संगमनगर पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असून त्यांच्यामार्फत कोणतेच नियोजन केले जात नाही. सदरच्या पाणीगळती मुळे या वाहतुक कोंडी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. या संदर्भात महाराष्ट्रजीवन प्राधिकरणाचे अभियंता यांच्याशी संपर्क केला असता लवकरात लवकर काम हाती घेतले जाईल असे आश्वासन दिले. सदर ठिकाणीगळतीच्या घटना वारंवार घडत असल्याने या गळतीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करत आहे.
