महत्त्वाच्या बातम्या

सर्वसमावेशक वित्तीय सेवांचा विस्तार करा, फिनटेक क्षेत्राला मोदींचे आवाहन

मुंबई: भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल अत्यंत उल्लेखनीय असून, आता केवळ पेमेंट्सपुरते मर्यादित न राहता क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या विविध वित्तीय सेवांचा व्यापक विस्तार करण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६‘ च्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेस भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, ग्लोबल फिनटेक फेस्टचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन यांच्यासह देश-विदेशातील अनेक नामवंत नवोन्मेषक, उद्योजक व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता आणि संघर्षाचे वातावरण असतानाही भारताने ७.८ टक्के मजबूत आर्थिक विकास दर नोंदवला असून, यामुळे जगाचा भारताच्या विकास क्षमतेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. भारताच्या फिनटेक यशोगाथेचा सर्वात मोठा कणा असलेल्या ‘यूपीआय’ने (UPI) अलीकडेच आपल्या प्रवासाची दहा वर्षे पूर्ण केली आहेत, अशी आठवण त्यांनी करून दिली. ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे तब्बल २ हजार ४०० कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाल्याचे सांगत, आता ही प्रणाली केवळ भारतापुरती मर्यादित न राहता ११ देशांमध्ये पोहोचली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंगापूर सोबतच्या पेमेंट प्रणालीच्या यशस्वी एकत्रीकरणा प्रमाणेच आगामी काळात भारताने इतर देशांच्या पेमेंट यंत्रणांशीही जोडणी वाढवण्याचे ध्येय ठेवावे, जेणेकरून परदेशातून भारतात पाठविल्या जाणाऱ्या पैशांवरील व्यवहार खर्च सुकर होईल, असे त्यांनी सांगितले.

        पारंपरिक बँकिंग व्यवस्थेच्या कक्षेत अजूनही न आलेली शेवटच्या घटकातील जनता आणि अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे डिलिव्हरी पार्टनर्स, स्वयंरोजगार करणारे कामगार यांना बचत, पेन्शन व विम्याच्या जाळ्यात ओढण्याचे मोठे कार्य फिनटेक कंपन्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘पीएम स्वनिधी’ योजनेच्या माध्यमातून लाखो पथविक्रेत्यांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडण्यात आल्याचे सांगत, या लाभार्थ्यांच्या सरासरी उत्पन्नात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन ती २०३० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. डिजिटल व्यवहारांमुळे छोट्या व्यावसायिकांची आर्थिक माहिती सुलभ उपलब्ध होत असल्याने त्यांना कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळणे शक्य झाले असून, फिनटेक क्षेत्राकडे अनौपचारिक क्षेत्राला सक्षम करण्याची पूर्ण क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.

         फिनटेकच्या आगामी टप्प्यात एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञानासारख्या अत्याधुनिक साधनांमुळे मोठ्या संधी निर्माण होत असल्या तरी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशातील सायबर सुरक्षा जागतिक दर्जाची बनवणे, नैतिक डेटा संरक्षण मानके विकसित करणे आणि प्रत्येक कंपनीच्या पारदर्शक मूल्यांकनासाठी ‘फिनटेक कन्झ्युमर प्रोटेक्शन इंडेक्स’ आणणे या चार मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला. या सोहळ्यात बोलताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी, फिनटेकमुळे आर्थिक समावेशनाला नवी दिशा मिळाल्याचे सांगून अकाउंट ॲग्रीगेटर आणि युनिफाइड लेंडिंग इंटरफेसच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्राला तारणविरहित कर्जाचा मार्ग कसा सुकर झाला आहे, याची माहिती दिली. तसेच, ग्लोबल फिनटेक फेस्टचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक जबाबदार आणि सर्वसमावेशक जागतिक वित्तीय व्यवस्था उभारण्यावर भर दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!