महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्यात एलसीबीची मोठी कारवाई; कोरेगावचा तरुण गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह गजाआड

​सातारा: जिल्ह्यात अवैध आणि विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व त्यांच्या पथकाने आज एका संशयित तरुणाला बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल, मॅग्झीन, जिवंत काडतूस आणि एका दुचाकीसह रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओमकार दत्तात्रय कदम (वय २३, रा. रामलिंग रोड, कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
        ​कोरेगाव ते सातारा रस्त्यावरील सह्याद्री ढाब्यासमोर एक तरुण आपल्या काळ्या रंगाच्या वेस्पा दुचाकीवरून (क्रमांक MH-11-DR-0981) गावठी पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तातडीने एलसीबीच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सातारा तालुक्यातील महागाव गावच्या हद्दीत, राजधानी हॉटेलशेजारी असलेल्या ‘पैलवान पानशॉप’समोर दबा धरून सापळा रचला. काही वेळातच बातमीतील वर्णनाचा तरुण दुचाकीवरून येताना दिसताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल (मॅग्झीनसह) आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी शस्त्र आणि दुचाकीसह सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून, संशयित आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ऍक्ट) कलम ३(१), ७, २५ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
         ​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर, सफौ. राजू मुलाणी, अतीष घाडगे तसेच पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, महेश निर्मळ आणि इरफान मुलाणी यांच्या पथकाने बजावली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!