महत्त्वाच्या बातम्या

पिंगळी बुद्रुकमध्ये शासकीय मालमत्तेची उघड लूट; बस शेडचे साहित्य रातोरात गायब, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प!

दहिवडी | वृत्तसेवा (दि. १७): ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘गावच्या विकासाचा’ गाजावाजा करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दाव्यांची पिंगळी बुद्रुक (ता. माण) येथे पार हवा निघाली आहे. येथील मुख्य चौकातील प्रवाशांचे हक्काचे बस स्थानक गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय अनास्थेमुळे मोडकळीस आले आहे. त्यातच भर म्हणजे, या सार्वजनिक मालमत्तेवर गावातीलच काही प्रवृत्तींनी डल्ला मारण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागणारे पुढारी आता या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.

उघड्यावर संसार, अस्तित्वासाठी झुंज!

पिंगळी बुद्रुक येथील बस थांब्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शेडचे छत कधीच उडून गेले आहे, तर लोखंडी खांब सडून कमकुवत झाले आहेत. संपूर्ण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य असून काटेरी झाडीझुडपे उगवली आहेत. प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण देणारा हा निवारा आज स्वतःच अस्तित्वाची लढाई लढत आहे.

या दुरवस्थेमुळे वृद्ध, महिला आणि शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. बसची वाट पाहत प्रवाशांना तासन् तास उन्हात उभे राहावे लागते, अथवा रस्त्याकडेला, दुकानाच्या पायऱ्यांवर जमिनीवर बसण्याची वेळ महिलांवर आली आहे. भर चौकात होणारी प्रवाशांची ही फरफट प्रशासकीय लाचार कारभाराचे धिंडवडे काढणारी आहे.

20260617_114215_11zon

चौकट: …आणि रातोरात शासकीय मालमत्ता गायब झाली!

या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक आणि चीड आणणारी बाब म्हणजे, गावातीलच एका महाभागाने “हे पिकअप शेड माझ्या खाजगी जागेत असून त्यावर माझाच हक्क आहे”, असा अजब दावा ठोकला. एवढ्यावरच न थांबता, कायदा खिशात घालून या व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत सार्वजनिक शेडचे तब्बल निम्मे लोखंडी साहित्य रातोरात गायब केले. शासकीय मालमत्तेची अशी उघड दरोडेखोरी होत असताना स्थानिक प्रशासन आणि गावचे कारभारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!