सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; खंडाळा उड्डाणपुलाची एक लेन खुली
सातारा: सातारा-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. खंबाटकी घाट परिसरातील खंडाळा येथील जुना टोलनाका उड्डाणपुलाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आजपासून या पुलावरील एक लेन अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. नवीन बोगदा सुरू झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून या परिसरातील वाहतूक सेवा मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावरून वळविण्यात आली होती, ज्यामुळे वाहनचालकांना तीव्र वाहतूक कोंडी चा सामना करावा लागत होता. आता नवीन लेन सुरू झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
सातारा-पुणे महामार्गावर प्रवास अधिक सुकर करण्यासाठी खंबाटकी घाटात नवीन दोन बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील एका बोगद्याची वाहतूक या वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही जुन्या टोलनाक्या जवळील उड्डाण पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणची संपूर्ण वाहतूक सेवा रस्त्यावरून काढावी लागली होती. अरुंद रस्ते आणि प्रचंड वाहनसंख्येमुळे या भागात सातत्याने वाहतुकीचा ताण येत असे, परिणामी वाहन चालकांना तासनतास ट्रॅफिक जाममध्ये अडकून राहावे लागे. या समस्येवर तातडीने मात करण्यासाठी प्रशासनाकडून उड्डाणपुलाचे राहिलेले काम वेगाने पूर्ण करण्यात आले.
संबधित रस्त्याचे आणि पुलाचे काटेकोरपणे सेफ्टी ऑडिट (Safety Audit) पूर्ण झाल्यानंतरच प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, पुण्याकडे जाणारी खंबाटकी घाटातील बोगद्यापासून ते खंडाळा गावापर्यंतची संपूर्ण लेन आता सर्वसामान्यांसाठी आणि वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे खंबाटकी घाट परिसरातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटला असून, प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. सातारा आणि पुणे दरम्यान ये-जा करणाऱ्या चाकरमानी, पर्यटक आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
