सातारा माची पेठेतील स्फोट प्रकरणात दोघांना अटक
सातारा माची पेठेतील दुकानात झालेल्या स्फोट प्रकरणाची चौकशी करत असताना स्फोटक पदार्थ जवळ बाळगणाऱ्या 2 आरोपींची नावे समोर आली आहेत. सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांच्या कोठडीची शिक्षा सुनावली आहे. शाहिद हमीद पालकर (वय 36), तरबेज गणी पालकर (वय 42 रा. गुरुवार पेठ परज, सातारा ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संबंधितांनी स्फोटक पदार्थ जवळ बाळगुन दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.साताऱ्यातील माची पेठे येथे बुधवार दि 2 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता भीषण स्फोट झाला . या स्फोटात मुजम्मील हमीद पालकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहेत.
फटक्यांच्या दारूमुळे हा भीषण अपघात झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणाची चौकशी करत असताना शाहिद पालकर आणि हमीद पालकर अशी आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडे स्फोटक पदार्थ कुठून आले, परवाना नसताना स्फोटक पदार्थ जवळ का बाळगले या संदर्भात त्यांची चौकशी सुरु आहे.याबाबबत अधिक तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र मस्के करत आहेत.
पुढील चौकशी साठी स्फोट झालेल्या ठिकाणचे नमुने पोलिसांनी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅब ला तपासणीसाठी पाठवले आहेत.
