सासवांचे केले सुनांनी पुजन तरं सुनांचेही जल्लोषी स्वागत.
जवळवाडीतील ह्रदयस्पर्शी सोहळ्याने महिला गहिवरल्या
जवळवाडी ता.जावळी येथिल महिला मंडळ जवळवाडी यांचे वतीने महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान श्रमाचा,ती च्या कर्तृत्वाचा! हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.आयुष्यभर कुटुंबासाठी राबणार्या, कष्टणार्या,श्रमणार्या महिलांचा सन्मान व्हावा यासाठीच या उपक्रमाचे आयोजन केल्याचे यावेळी बचत गटाच्या प्रेरीका सौ.राजश्री रमेश पाटील यांनी सांगितले.
महिला दिनाचे निमित्ताने सर्वत्र वेगवेगळे उपक्रम साजरे होत असताना जवळवाडी येथे मात्र अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. रांगोळ्या,फुलांच्या पायघड्यांनी ग्रामदैवत भैरनाथ मंदिरासमोरील प्रांगण सजविण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच महिलांची मंगल वाद्यांच्या गजरात फुलांची उधळण करत स्वागत मिरवणूकीने कार्यक्रम स्थळी आगमन झाले.सुरवातीलाच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होवून महिलांच्या गळाभेटी झाल्या.
यावेळी या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना सौ.राजश्री पाटील म्हणाल्या वर्षाचे ३६५ दिवस महिला कुटुंबासाठी शेती बरोबरच अनेक कष्टाची कामे करीत असतात.अशा कष्टणार्या सर्व महिलांच्या श्रमाचा,कष्टाचा सन्मान करण्यासाठी व जेष्ठ पिढी म्हणजे सासुबाई यांचाही सन्मान व्हावा यासाठीच कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.
ग्रामसेविका कु.शाहुबाई नालाफल्ले यांनी ग्रामपंचायतीच्या अनेक योजनांची माहिती देवून गावखेड्यातील महिलांमध्ये आपुलकी,प्रेम आणि जिव्हाळा पहायला मिळतो. आपल्या गावातील महिलांनी राबविलेला उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.यावेळी गिताताई लोखंडे, शांताबाई जवळ,निकिता जवळ,वैभवी जवळ यांनीही मनोगते व्यक्त केली.
जवळवाडी गावातील जमलेल्या सर्व जेष्ठ महिला म्हणजेच सासुबाईंचे औक्षण व पाद्य पुजन करून आरतीने ओवाळण्यात आले. यावेळी या आगळ्या वेगळ्या पूजनाने महिलांची मने भरून आली होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली जवळ यांनी केले तर मा.सरपंच सौ.वर्षाताई जवळ यांनी आभार मानले.
