महत्त्वाच्या बातम्या

“साहित्याचे स्वरूप समाजदर्शन घडवणारे असते; ज्येष्ठ कलावंत पुरस्काराने प्रा. व. बा. बोधे यांचा गौरव”

सातारा: साहित्य कला विकास प्रतिष्ठान, सातारा यांच्या वतीने ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ज्येष्ठ कलावंत पुरस्कार, संशोधन पुरस्कार आणि ग्रंथ शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सातारा नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ कलावंत पुरस्कार प्रा. व. बा. बोधे यांना, संशोधन पुरस्कार डॉ. मुकुंद कुळे (मुंबई) यांना तर ग्रंथ शिक्षक पुरस्कार डॉ. सुधीर नगरकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे, अध्यक्षा डॉ. सुनिता उत्तेकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्राचार्य एच. व्ही. देशपांडे तसेच सुनिता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

        पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रा. व. बा. बोधे म्हणाले, “माझी जडणघडण ग्रामीण भागात झाली. तेथील निसर्ग, माणसे आणि प्राणी यांच्याशी मी समरस झालो. त्याचे प्रतिबिंब माझ्या साहित्यामध्ये उमटले आहे. अनेक अडचणींना सामोरे जात साहित्य क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. साहित्याचे स्वरूप समाजदर्शन घडवणारे असते. समाज, राजकारण आणि माणसांचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते आणि तेच साहित्य वास्तववादी ठरते.”याच कार्यक्रमात डॉ. मुकुंद कुळे यांनी लोकसाहित्य क्षेत्रातील संपादन व संशोधन कार्याबाबत आपली भूमिका मांडली. तर डॉ. सुधीर नगरकर यांनी ग्रंथालयीन सेवेदरम्यान आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष कै. ॲड. डी. व्ही. देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कै. डी. व्ही. देशपांडे लिखित ‘संक्षेप रामायण’ या संशोधनपर ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू एच. व्ही. देशपांडे यांनी ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रा. व. बा. बोधे यांच्या मानपत्राचे वाचन लेखक डॉ. राजेंद्र माने यांनी, डॉ. मुकुंद कुळे यांच्या मानपत्राचे वाचन कवी प्रदीप कांबळे यांनी, तर डॉ. सुधीर नगरकर यांच्या मानपत्राचे वाचन सहकार्यवाह सुनिता कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिता कदम यांनी केले. या कार्यक्रमास शिरीष चिटणीस, सौ. नूतन बोधे, डॉ. अनिमिष चव्हाण, अमन चव्हाण, डॉ. नीला उत्तेकर, प्रकाश बोधे, सौरभ देशपांडे, किरण बोधे, भारती झिमरे, ए. व्ही. देशपांडे यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!