महत्त्वाच्या बातम्या

सैन्य व पोलीस भरती होणाऱ्या युवक युवतींसाठी मुक्तागिरी मुक्तांगण सदैव तत्पर: अनिल देसाई

 

    विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये निश्चित ध्येय ठरविले पाहिजे आणि ठरविलेल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घेऊन त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे असे प्रतिपादन माण खटावचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई यांनी केले. ते आदर्श गाव बनगरवाडी ता. माण येथे मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशन आयोजित दोन दिवसीय आर्मी व पोलीस भरती मोफत निवासी शिबिर प्रसंगी बोलत होते.

 

     यावेळी नि.डी.वाय. एस. पी अरुण सावंत ,कुकुडवाड जि.प गटाचे युवा नेते महेंद्र भैय्या देसाई, बनगरवाडी चे सरपंच विक्रम शिंगाडे,जालिंदर खरात, एस. बी आर करिअर अकॅडमी चे अनिल बनगर, राजे करिअर अकॅडमी चे महेश गायकवाड,सदाशिव बनगर साहेब,दादासाहेब शिंगाडे, देवा पूर चे मा.उपसरपंच किरण बाबर , माणगंगा विकास सेवा सोसायटीचे संचालक अरुण माने, समीर माने,सागर बाबर,भारत नाना अनुसे,सयाजी बाबर,बनसोडे सर, युवराज काळेल, तोरणे सर, अजित काळेल, ढेरे सर , प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

     उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले की,भारत देश हा तरुणांचा देश आहे. त्यातच माण खटाव तालुका ही विविध क्षेत्रातील नव रत्नांची खाण आहे. देशसेवेचे व्रत स्वीकारून आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर रात्रंदिवस चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. आपले कार्य आपण आपल्या कर्तव्य भावनेने केले पाहिजे.छोटेसे गाव असणाऱ्या बनगर वाडीतील आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, जिल्हाधिकारी हनुमंत बनगर यांचा आदर्श घेऊन प्रशिक्षणार्थीनी वाटचाल करावी.या ठिकाणी ग्रामीण भागातील युवक युवतींची संख्या जास्त आहे. आपण ग्रामीण भागातील आहोत ही भावना बाजूला सारून ध्येय निश्चितीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत. भरती होऊन देश सेवा करू पाहणाऱ्या युवक युवतींसाठी मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

 

     नि. डी. वाय. एस. पी अरुण सावंत म्हणाले की आर्थिक परिस्थिती वर मात करण्याची ज्यांच्यात जिद्द असते असेच विद्यार्थी ध्येयापर्यंत जातात.आपण आपल्या यशस्वी जीवनासाठी आपले कुटुंब, गाव, जिल्हा सोडून बाहेर ठिकाणी गेले पाहिजे. आपल्या देशासाठी आपण कार्य केले पाहिजे कारण आपल्या कार्यामुळेच देश हा समृद्ध बनू शकतो त्यामुळे आपण सातत्याने चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रम यातून आपले निश्चित उद्दिष्टे प्रामाणिकपणे कार्य करून साध्य केले पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी निवृत्त आर्मी पी .टी ट्रेनर जालिंदर खरात, भारत अनुसे, अनिल बनगर, महेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श सरपंच विक्रम शिंगाडे यांनी केले तर आभार

भारत अनुसे यांनी मांडले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!