सोनगावची शाळा शिक्षणाचे माॅडेल म्हणून उभे रहावे – आ. शशिकांत शिंदे
सातारा: सद्या इंग्रजीला फार महत्त्व दिल्याने मराठी शाळांचे मूल्यांकन कमी होत आहे. शहरांतील शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी पालकांमध्ये विश्वास निर्माण करून सोनगाव सं निंब ची शाळा प्रगतशील शिक्षणाचे माॅडेल म्हणून उभी करण्याचा संकल्प करावा असे प्रतिपादन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
सातारा तालुक्यातील सोनगाव सं निंब जि.प. शाळेच्या शतकपूर्ती महोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या माजी शिक्षक सत्कार व माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ.प्रमोद शिंदे, जि.प.च्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनिल काटकर, सतिश चव्हाण,पनवेल, कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी सुजाता जाधव, शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, रवींद्र खंदारे, केंद्रप्रमुख रमेश मगर, मुख्याध्यापिका संगिता कदम, सरपंच अश्विनी कदम,चंद्रकांत चव्हाण, शिक्षक बॅकेचे संचालक विशाल कणसे, व्याख्याते प्रदिप कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सत्ता नसतानाही जेवढा निधी वाट्याला आला तेवढा येथील शाळेच्या उभारणीसाठी दिला असून विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती वाढवण्यासाठी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज वाचनालय उभे करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ही शाळा दत्तक घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी संकल्प करू या, शाळेचा सोनगाव पॅटर्न उभा करून शिक्षकांनी पालकांमध्ये विश्वास निर्माण करावा असे सांगून ते म्हणाले, निवडणुकांमध्ये राज्यकर्ते जेवढा पैसा खर्च करतात त्यापैकी ते गुणवत्तापुर्ण विद्यार्थी व शाळा उभारणीसाठी किती खर्च करतात याचा निकष व मुल्यमापन मतदारांनी करणे आवश्यक आहे. शिक्षकांचा सत्कार ही त्यांच्या प्रेमाची उतराई असून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्याकामी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची त्यांनी सुचना केली .
डॉ. प्रमोद शिंदे म्हणाले, येथील शाळेचे प्रांगण ही आपुलकी असून शंभर वर्षांच्या काळात शाळेने अनेक चढउतार पाहिले. आ. शशिकांत शिंदे यांनी शाळा उभारणीसाठी मोलाची मदत केली. यापुढे शाळेत कोशल्य आधारित प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी तसेच ई-लर्निग कामी आर्थिक मदत उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल. शाळा व गावाच्या विकासासाठी ‘आम्ही सोनगावकर’ हा ब्रॅण्ड तयार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
रमेश चव्हाण म्हणाले, शाळा ही मोठी संपत्ती असून या संपत्तीला गुरू जनांनी बलवान केले आहे. शाळा व मंदिराचे पावित्र्य ज्यांनी जोपासले त्या गावचा आर्थिक प्रश्न व गुणवत्ता कधीही मागे पडत नसून शाळेचे विद्यार्थी वाढावेत. शिक्षक देण्याची आमची जबाबदारी असून शिक्षकांना सर्व भौतिक सुविधा देताना या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जावा असे मत व्यक्त केले. यावेळी शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शनिवार, रविवारी विद्यार्थ्यांचे जादा तास घेण्याचा शिक्षकांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
या प्रसंगी प्रदिप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा प्रारंभी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रास्ताविक माजी सरपंच विजय चव्हाण यांनी केले. सुत्रसंचलन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.सुनील शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास उपसरपंच सचिन रसाळ, कल्याण शिंदे, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र लोखंडे, प्रभाकर शिंदे, सुनील शिंदे, विजय शिंदे, अनिल शिंदे, प्रभावती शिंदे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, शिक्षक, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
