६ हजार कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार होणार; ठाण्यात क्लस्टर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन
मुंबई: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ आज दिमाखात पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे २० हेक्टर म्हणजेच तब्बल ५० एकर परिसरात पसरलेल्या या विशाल प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ६ हजार कुटुंबांना हक्काची, सुरक्षित आणि उच्च दर्जाची आधुनिक घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केवळ निवासी इमारतींची उभारणी न करता, येथे २३ प्रकारच्या अत्याधुनिक नागरी सुविधा आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून एका नव्या आणि सुसज्ज ठाण्याची उभारणी करण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) आगामी १५ ते २० वर्षांच्या कालावधीत तब्बल ३० लाख नवीन घरे उभारण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य राज्य शासनाने ठेवले आहे. ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये क्लस्टर पुनर्विकास योजनांना गती देण्याचे शासनाचे धोरण असून, युनिफाइड डीसीपीआरमध्ये (UDCPR) करण्यात आलेल्या सकारात्मक बदलांमुळे एसआरए आणि क्लस्टर प्रकल्पांना मोठा वेग मिळाला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले. ठाण्यातील या प्रकल्पात केवळ राहण्यासाठी सिमेंटच्या चार भिंती नव्हे, तर ‘सिटी विथिन द सिटी’ (City Within the City) या आधुनिक संकल्पनेवर आधारित परिपूर्ण टाऊनशिप उभारली जाणार आहे. यामध्ये प्रशस्त रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, अत्याधुनिक सांडपाणी व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, हिरवेगार गार्डन्स, खेळणी व मैदानाची सोय, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्सची सुविधा, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि संपूर्ण परिसरात स्मार्ट स्ट्रीट लाईटिंग यांसारख्या २३ मूलभूत व महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
ठाण्यातील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुर्घटनांचा भूतकाळ उजाळताना एकनाथ शिंदे यांनी हा क्लस्टरचा प्रवास तब्बल २० वर्षांच्या खडतर संघर्षातून पुढे आल्याचे सांगितले. किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह अनेक जीवघेण्या दुर्घटना नंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून उपोषणे, मोर्चे काढल्याचे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवल्याची आठवण त्यांनी काढली. अखेर नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व धोरणात्मक व कायदेशीर अडथळे दूर करून हा क्लस्टर प्रकल्प प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. किसननगरमधील पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाकडे असून लवकरच संबंधित रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या क्लस्टरमध्ये निवासी बांधकामासोबतच कमर्शियल विकासावर भर देण्यात आला असून, ‘घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे’ या ‘वॉक टू वर्क’ (Walk to Work) संकल्पनेमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे दालन खुले होणार आहे. तसेच, ऐतिहासिक सिद्धेश्वर तलाव परिसराचा पुनर्विकास आणि सौंदर्यीकरण करून तलावाला मोकळा श्वास मिळवून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत बोलताना त्यांनी विकासकांना अत्यंत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दोन पैसे नफा कमी झाला तरी चालेल, मात्र नागरिकांना दिल्या जाणाऱ्या घरांच्या दर्जात कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे सांगत शासनाकडून या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. रहिवाशांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करताना कॉर्पस फंड, परवडणाऱ्या दरात अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा आणि परिसरातील लहान दुकानदारांचे पुनर्वसन याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि बहुप्रतिक्षित ठाणे-बोरिवली बोगदा यांसारख्या क्लस्टर आणि पायाभूत सुविधांच्या जाळयामुळे ठाण्याच्या विकासाला एक नवी आणि ग्लोबल दिशा मिळणार आहे. हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या पंक्तींचा दाखला देत, विकासकांनी नागरिकांना वेळेत दर्जेदार घरे देतानाच त्यांना मोठा टीव्ही भेट म्हणून द्यावा, अशी मिश्कील सूचना करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
