पुणे

पुणे पोलिसांची धडक कारवाई! पाच वर्षांपासून फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

येरवडा पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न, दंगल आणि आर्म्स ॲक्टसह विविध गंभीर गुन्ह्यांत होता सहभागी; गुन्हे शाखा युनिट-४ची कामगिरी

पुणे :  शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने गेल्या पाच वर्षांपासून पाहिजे असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न, दंगल आणि आर्म्स ॲक्टसह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या या आरोपीला विश्रांतवाडी चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपी तसेच गंभीर गुन्ह्यांतील आणि उघडकीस न आलेल्या चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना दिले होते.

या आदेशानुसार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-४चे पथक खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई आणि पेट्रोलिंग करत असताना विश्रांतवाडी चौक, पुणे-आळंदी रोड परिसरात आले होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन साबळे आणि सुभाष आव्हाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात गेल्या सुमारे पाच वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी संग्रामसिंग गजसिंग भादा हा शिवनगरी कॉलनी, डी. पी. रोड, आदर्शनगर, दिघी, पुणे येथे राहत आहे.

या माहितीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांना माहिती देण्यात आली. त्यांनी माहितीची खातरजमा करून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार युनिट-४च्या पथकाने शिवनगरी कॉलनी, डी. पी. रोड, आदर्शनगर, दिघी परिसरात जाऊन संशयिताचा शोध घेतला. बातमीदाराने दिलेल्या वर्णनाशी मिळताजुळता इसम आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला. त्यावेळी त्याने आपले नाव संग्रामसिंग गजसिंग भादा, वय ३५ वर्षे, रा. शिवनगरी कॉलनी, डी. पी. रोड, आदर्शनगर, दिघी, पुणे असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संबंधित गुन्ह्याची माहिती पडताळण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४४/२०२२ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, १४३, १४६, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, ३५२, आर्म्स ॲक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट २०१३ मधील कलम ३ व ७ अंतर्गत दाखल गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड, नितीन साबळे, जहांगीर पठाण, अमजद शेख, दत्तात्रय गेंगजे, रोहिणी पांढरकर, अनिकेत भोसले, वैभव रणपिसे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

error: Content is protected !!