सातारा

महाड–अक्कलकोट बसमधून विद्यार्थ्यांना निर्जनस्थळी सोडल्याचा प्रकार; मनसे आक्रमक!

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

दहिवडी:  महाड–अक्कलकोट एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोंदवले बुद्रुक व गोंदवले खुर्द या नियोजित थांब्यांवर न उतरवता गावापासून सुमारे दोन किलोमीटर पुढे निर्जनस्थळी सोडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या प्रकारामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवासादरम्यान चालक आणि वाहकांकडून विद्यार्थ्यांना अरेरावी, दमदाटी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.

      ​या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दहिवडी एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन संबंधित चालक व वाहकांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दहिवडी–म्हसवड मार्गावरील सर्व गाड्या अधिकृत थांब्यांवर थांबवण्याच्या स्पष्ट सूचना चालक-वाहकांना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

       ​या प्रकरणात ४८ तासांच्या आत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास मनसेतर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी मनसेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती एसटी विभाग नियंत्रक व दहिवडी पोलीस ठाण्यालाही पाठवण्यात आल्या असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!