दहिवडी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी! ७ लाख २० हजार किमतीचे हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द
दहिवडी: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने विशेष मोहीम राबवून गहाळ व चोरी गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेत नागरिकांना एक अनोखी भेट दिली आहे. CEIR पोर्टल व तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी एकूण ७ लाख २० हजार रुपये किमतीचे २९ मोबाईल हँडसेट हस्तगत केले असून ते मूळ मालकांना परत केले आहेत.
दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल गहाळ तसेच चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांतून २९ मोबाईल शोधून हस्तगत केले. हे सर्व मोबाईल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले असून, मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी दहिवडी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार बापू खांडेकर, सचिन जगताप, पोलीस नाईक नितीन धुमाळ, तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र खाडे, अजिनाथ नरबट आणि आसिफ नदाफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
