पुणे

पुणे पोलिसांची आंध्र प्रदेशात मोठी कारवाई! मोक्का गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गंभीर गुन्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का प्रकरणातील या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आंध्र प्रदेशातील पलनडू जिल्ह्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूराम लिचमणाराम उर्फ लक्ष्मण गेहलोत (वय २७, रा. मूळगाव डाऊ, ता. जायल, जि. नागौर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भारतीय दंड विधानातील कलम ३९४, ५०४, ५०६, ३२३, ३४ तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस अंमलदार अतुल साठे आणि आशिष राठोड यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची पडताळणी केली असता आरोपी आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यातील दाचेपल्ली परिसरात असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार अतुल साठे, आशिष राठोड, पुरुषोत्तम गुंजाळ आणि योगेश झेंडे यांचे पथक आंध्र प्रदेशात रवाना झाले. पथकाने दाचेपल्ली येथील बाबा रामदेव ढाब्याजवळ, एनएचपी पंपाजवळील नाकेरपट्टली महामार्ग परिसरात कारवाई केली. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

अटकेनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे या कारवाईतून दिसून येते.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

error: Content is protected !!