पुणे

पुणे जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा उपक्रम

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे:
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार, पुणे जिल्ह्यात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह २०२६’ (Vigilance Awareness Week) साजरा करण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराला आळा घालणे, पारदर्शक प्रशासन निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करणे या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), पुणे युनिटतर्फे संपूर्ण पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहादरम्यान शासकीय व निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच ग्रामीण भागात विविध स्पर्धा, व्याख्याने, कार्यशाळा व पथनाट्यांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सॲप, एसएमएस, ई-मेल व समाजमाध्यमांद्वारेही भ्रष्टाचारविरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले जातील.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम व परिसर:
२६ ऑक्टोबर (सोमवार): पुणे ग्रामीण (यवत, दौंड, भिगवण, इंदापूर), लोणी काळभोर परिसर, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे मनपा, आरटीओ व ससून रुग्णालय परिसर.
२७ ऑक्टोबर (मंगळवार): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए कार्यालय, आकुर्डी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, लोणावळा व खंडाळा परिसर.
२८ ऑक्टोबर (बुधवार): पुणे रेल्वे स्टेशन परिसर, म्हाडा, येरवडा, स्वारगेट, सारसबाग, फरासखाना, विश्रामबाग व तहसील कार्यालय (हवेली).
२९ ऑक्टोबर (गुरूवार): औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी कोर्ट व स्टेशन परिसर, सासवड, जेजुरी आणि बारामती परिसर.
३० ऑक्टोबर (शुक्रवार): नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, चंदननगर, हडपसर, वानवडी, मुंढवा, भोर, वेल्हे व शिरूर-रांजणगाव एमआयडीसी परिसर.
३१ ऑक्टोबर (शनिवार): भोसरी, नाशिक रोड, आळंदी, दिघी, चऱ्होली व विश्रांतवाडी परिसर.
१ नोव्हेंबर (रविवार): चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, जुन्नर, लोणीकंद, शिक्रापूर व शिरूर परिसर.
नागरिकांना आवाहन:
शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी या जनजागृती सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सतिश संभाजी वाळके (सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे) यांनी केले आहे.

error: Content is protected !!