पुणे

पुण्यात तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न; मैत्रिणीच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, CCTV फुटेज समोर!

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुख सागरनगर परिसरात १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरुणीच्या मदतीला तिची मैत्रीण आणि स्थानिक नागरिक धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुखसागरनगर येथील समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. यावेळी जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने तिच्याजवळ येऊन तिच्या छातीला हात लावल्याचा आणि शर्ट ओढून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली आणि तिने आरडाओरड सुरू केली.

तरुणीचा आवाज ऐकून तिची मैत्रीण तातडीने मदतीला धावली. तिने आरोपीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणी खाली पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली. मात्र, आरोपीने त्यानंतरही तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला रोखले. आरोपीने नागरिकांनाही मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, या गोंधळात एका व्यक्तीचा मोबाइल जमिनीवर फेकून फोडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

“मैत्रीण आली म्हणून वाचले; आरोपीला शिक्षा झाली पाहिजे!”

घटनेनंतर पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. “मी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबले होते. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती माझ्या शेजारून फिरत होती. त्यानंतर त्याने अचानक मला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. माझी मैत्रीण आली आणि तिने त्याला ढकलले. त्यामुळे मी खाली पडले आणि माझ्या हाताला लागले. तरीही तो मला उचलून नेण्याचा प्रयत्न करत होता. नंतर नागरिक जमा झाले, तेव्हा तो त्यांनाही मारण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्याला शिक्षा झाली पाहिजे. माझी मैत्रीण वेळीच आली नसती, तर तो मला घेऊन गेला असता,” असे पीडित तरुणीने सांगितले.

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुण्यासारख्या मोठ्या शहरात सार्वजनिक ठिकाणी तरुणीशी अशा प्रकारचा कथित गैरप्रकार घडल्याने महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. गर्दीच्या परिसरातही तरुणींना सुरक्षितपणे वावरता येते का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तरुणीला मदत मिळाली असली, तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांच्या तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

error: Content is protected !!