ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांचा ८.५३ लाखांचा गंडा; पेन्शन कार्डच्या बहाण्याने फसवणूक
कोथरूड : ज्येष्ठ नागरिक पेन्शन कार्डची माहिती घेण्याच्या बहाण्याने एका ७६ वर्षीय व्यक्तीची तब्बल ८ लाख ५३ हजार ९ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मोबाईलधारक आणि विविध बँक खात्यांच्या वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑनलाइन माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. आरोपीने ज्येष्ठ नागरिकाला फोन करून सीनियर सिटीझन पेन्शन कार्डबाबत माहिती घेतली. त्यानंतर व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून फिर्यादी यांच्या मोबाईलमधील माहिती मिळवली.
यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय आयसीआयसीआय बँकेचे ॲप इन्स्टॉल केले. या माध्यमातून इतर महत्त्वाची माहिती मिळवून फिर्यादी यांच्या खात्यातून आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारात फिर्यादी यांचे एकूण ८ लाख ५३ हजार ९ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी), ६६(डी) आणि ४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल मान हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
नागरिकांना आवाहन : बँक खाते, पेन्शन कार्ड किंवा शासकीय योजनांच्या नावाखाली फोन करणाऱ्या अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नका. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये बँकिंग ॲप इन्स्टॉल करू नका किंवा स्क्रीन शेअरिंगची परवानगी देऊ नका. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
