मैत्रिणीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला! एमपीडीएतील पाहिजे आरोपीला अटक
पुणे: एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आलेला आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अखेर येरवडा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. निखिल मधुकर कांबळे (वय २२, रा. प्रज्ञासागर बुद्ध विहाराजवळ, बनसोडे चौक, लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
येरवडा आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत तसेच तडीपार गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला दिले होते. त्यानुसार लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार राहुल परदेशी, अक्षय शिंदे आणि किरण भागीत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निखिल कांबळे हा आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येथील सर्गम हॉटेलजवळील एका गाडीतून येरवडा परिसरात आला आहे.
या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात आणून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी करण्यात आली. यावेळी तो खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमपीडीए कारवाईमधील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध २८ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस आयुक्तांनी स्थानबद्धतेचे आदेश पारित केले होते. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ चिलुमुला रजनिकांत आणि येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांदे, पोलीस निरीक्षक अमर कदम, दिलीपकुमार वेडे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
