पुण्यात चोरट्यांचा नवा डाव! बंद दुकानाची लोखंडी खिडकी तोडून एक लाखांचा पितळी ऐवज लंपास; रविवार पेठेत खळबळ!
पुणे : पुण्यातील व्यापारी पेठांमध्ये बंद दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवार पेठेतील धनलक्ष्मी मेटल इंडस्ट्रीज या दुकानाला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत तब्बल एक लाख रुपयांचे पितळी साहित्य चोरून नेले. दुकानाची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील २३५ येथे धनलक्ष्मी मेटल इंडस्ट्रीज हे दुकान आहे. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. दुकानाच्या खिडकीला असलेली लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील पितळेचे कान आणि कडे असे साहित्य चोरून नेले. चोरीला गेलेल्या साहित्याची किंमत अंदाजे एक लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी ३८ वर्षीय दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५ आणि ३३१(३) अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
