पुणे

पुणेकरांनो, दिवाळीची मिठाई खाताना सावधान! लाडू भंडारवर FDA चा छापा; १,१९० किलो लाडू-बुंदी जप्त!

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील गायत्री लाडू भंडारवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई करत तब्बल १ हजार १९० किलो मोतीचूर लाडू आणि बुंदीचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मिठाईची किंमत सुमारे १ लाख ७३ हजार ९५० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
      दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. या तपासणीदरम्यान गायत्री लाडू भंडारमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात खाद्यरंगाचा वापर होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. मिठाई तयार करताना आवश्यक असलेल्या स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचेही पालन होत नसल्याचे तपासणीत आढळले.

       विशेष म्हणजे, अन्नपदार्थांच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी मागणी करूनही संबंधित आस्थापनेला आवश्यक विश्लेषणात्मक चाचणी अहवाल सादर करता आले नाहीत. तपासणीदरम्यान लाडू आणि बुंदी व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात खाद्यरंगाचे डबे, गुलाबजाम तसेच साखरेच्या पाकाचा साठाही आढळून आला.
अन्न सुरक्षा कायद्यातील अनुसूची ४ नुसार मिठाई तयार करताना स्वच्छता, सुरक्षितता आणि उत्पादन प्रक्रियेबाबत ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित युनिटमध्ये या नियमांचे उल्लंघन झाल्याचे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले. खाद्यरंग वापरण्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादांचे पालन न झाल्याने प्रशासनाने ही जप्तीची कारवाई केली.
      विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मिठाई उत्पादकांना खाद्यरंगाच्या वापराबाबत नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. पुणे मर्चंट चेंबरच्या दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात त्यांनी मिठाईमधील रंगांचा वापर निर्धारित प्रमाणातच करण्याचे आवाहन केले होते. दिवाळीच्या तोंडावरच मिठाईच्या उत्पादन प्रक्रियेतील अनियमितता समोर आल्याने ग्राहकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या काळात आकर्षक रंग आणि दिसण्यावर भाळून मिठाई खरेदी करण्याऐवजी तिची गुणवत्ता आणि स्वच्छतेकडेही ग्राहकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!