महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफनंतर तुषार कपूर रडारवर; हॅरी बॉक्सरच्या नावाने पाच कोटींची धमकी

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्याचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता अभिनेता तुषार कपूर याला पाच कोटी रुपयांची खंडणी मागणारा धमकीचा संदेश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख कुख्यात गँगस्टर हॅरी बॉक्सर अशी करून दिल्याचे सांगितले जात आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने तुषार कपूरकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजाची हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी पडताळणी करण्यात आली. मात्र, दोन्ही आवाजांमध्ये साम्य आढळून आले नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हॅरी बॉक्सरच्या नावाचा वापर करून कलाकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
      हॅरी बॉक्सरचे नाव यापूर्वीही बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध व्यक्तींना देण्यात आलेल्या धमक्यांच्या प्रकरणांत समोर आले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंग यांनाही धमक्या दिल्याच्या प्रकरणांत त्याचे नाव चर्चेत आले होते. बॉक्सरचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याचे सांगितले जाते.

      दरम्यान, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. हरियाणातून अमर मुंडिया याला अटक करण्यात आली असून, त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
      या गोळीबार प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तुले आणि काडतुसे गुजरातमधील सुरत येथून जप्त करण्यात आली आहेत. तसेच शस्त्रपुरवठा करणाऱ्या संशयितांचाही तपास सुरू आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर आता तुषार कपूरला मिळालेल्या धमकीमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धमकीमागे खरोखरच गुन्हेगारी टोळीचा हात आहे की तिच्या नावाचा वापर करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!