पुण्यात गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून ८ लाख ७० हजारांची ऑनलाइन फसवणूक; APK फाईल डाउनलोड करायला लावून गंडा
पुणे : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, सायबर चोरट्यांनी आता गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे एका १९ वर्षीय तरुणाची तब्बल ८ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीने मोबाईलधारक व बँक खातेधारकाचा वापर केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. आरोपीने फिर्यादीच्या आईच्या नावावर असलेल्या गॅस कनेक्शनबाबत फोन केला. गॅस कनेक्शनचे बिल भरले नसल्याने कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगून फिर्यादीला घाबरवले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर APK फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने ही फाईल डाउनलोड केल्यानंतर आरोपीने त्याचा गैरफायदा घेत आर्थिक व्यवहार केले आणि फिर्यादीच्या आईच्या बँक खात्यातून तब्बल ८ लाख ७० हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले.
या घटनेनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रल्हाद गिते करीत आहेत.
