शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार; कोयत्यानेही हल्ला, पुण्यात खळबळ
न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हल्ल्याचा थरार; मंदार किवळे गंभीर जखमी, हल्लेखोरांचा शोध सुरू
पुणे: शहरातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात बुधवारी भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक चारजवळ हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांची वर्दळ असणाऱ्या न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच सशस्त्र हल्ला झाल्याने न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंदार किवळे याच्यावर काही हल्लेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्लेखोरांची संख्या पाच ते सहा असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींच्या कथनातून समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
घटनास्थळावर पिस्तूल आणि काडतुसांनी भरलेले मॅगझीन आढळल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला असून हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. गुन्हे शाखेची पथकेही तपासात सहभागी झाली आहेत.
या घटनेला आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी असल्याचे वृत्तसमोर आले आहे. मंदार किवळे हा एप्रिल २०२५ मध्ये कात्रज परिसरातील शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती वृत्तमाध्यमांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता आणि न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयात आला असताना त्याच्यावर हा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे जुन्या वादातून सूड घेण्याचा प्रकार आहे का, या दिशेनेही तपास महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
विशेष म्हणजे, न्यायालयाला दोन दिवसांपूर्वी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची घटना ताजी असतानाच न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हा सशस्त्र हल्ला झाला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. फरार आरोपींचा शोध घेणे आणि हल्ल्यामागील कारण स्पष्ट करणे हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे.
