पुणे

बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षाचालकांचा एल्गार! माधुरी मिसाळ यांच्या बंगल्यासमोर जोरदार निदर्शने

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:


रॅपिडो, उबरच्या बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा बंदची हाक, सरकारच्या धोरणाविरोधात संघटना आक्रमक
पुणे : पुणे शहरातील बाईक टॅक्सी सेवांच्या मुद्द्यावरून रिक्षाचालकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. रॅपिडो आणि उबरसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांना विरोध दर्शवत सोमवारी दि २३ रोजी रिक्षाचालकांनी परिवहन राज्यमंत्री तथा पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या बंगल्यासमोर निदर्शने केली. बाईक टॅक्सीला परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने तयार केलेले धोरण रद्द करावे आणि शहरातील बाईक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी बंद कराव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

    पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून बाईक टॅक्सी सेवांचा विस्तार होत आहे. रॅपिडोने शहरात बाईक टॅक्सी सेवा सुरू केल्यानंतर या व्यवसायाला उबरनेही सुरुवात केली. यामुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या प्रवासी संख्येवर आणि दैनंदिन उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा दावा रिक्षा संघटनांनी केला आहे. विशेष म्हणजे, बाईक टॅक्सी सेवांना आवश्यक परवानग्या नसल्याचा आरोपही संघटनांकडून करण्यात येत आहे.
   रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, रिक्षा व्यवसायासाठी विमा, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, निर्धारित भाडेदर, वाहनांची रंगसंगती आणि चालकांचा गणवेश अशा विविध नियमांचे पालन करावे लागते. मात्र, खासगी दुचाकींचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांवर समान नियम लागू होत नसल्याने रिक्षा व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर अन्यायकारक स्पर्धेचा परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

    या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा पंचायत, आझाद रिक्षा संघटना आणि छावा वाहनचालक कामगार संघ यांच्यासह विविध संघटना एकत्र आल्या आहेत. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ ते दुपारी २ ते ३ या वेळेत रिक्षा बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार होते. पुण्यात माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयासमोर, तर पिंपरी येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोरही निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.
     यापूर्वीही बाईक टॅक्सीच्या परवानगीच्या मुद्द्यावरून रिक्षा संघटनांनी न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर विरोध नोंदवला होता. आता पुन्हा सरकारकडून बाईक टॅक्सी धोरणाला चालना दिली जात असल्याच्या चर्चेमुळे रिक्षाचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या धोरणाचा पुनर्विचार करून बाईक टॅक्सी सेवांना महानगरांमध्ये परवानगी देऊ नये, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

     दरम्यान, या आंदोलनामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागू शकतो. बाईक टॅक्सी सेवा आणि पारंपरिक रिक्षा व्यवसाय यांच्यातील संघर्ष आता थेट सरकारच्या धोरणापर्यंत पोहोचल्याने या आंदोलनानंतर परिवहन विभाग काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!