थांबलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार
पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार –
ना.जयकुमार गोरे
दहिवडी प्रतिनिधी,ता.२३:
माण-खटावसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पाणीटंचाई आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्यात येत आहेत. ट्रान्सफॉर्मरअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महावितरणने चांगल्या दर्जाचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून पाणीपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पशुधन ही आपली ताकद असून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
माण तालुक्यातील गोंदवले येथील शेतकरी भवन येथे माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे, आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य अर्जुन काळे (तात्या), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण साहेब, जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील, जिल्हा परिषद सदस्य अलका जगदाळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नंदकुमार मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सभापती सौ. वनिता दुबळे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कदम, पंचायत समिती सदस्य राजाराम बापू बोराटे, पंचायत समिती सदस्य उषा भोसले, सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा सातारा जिल्हा परिषदेचे मा. सदस्य बंडा गोडसे सर, संजय काका गांधी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव शिंदे, म्हसवड नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. पूजा सचिन विरकर, आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे, भाजपा माण तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड, महिला मोर्चा भाजपा अध्यक्ष अर्चना सावंत, तहसीलदार बाई माने, तहसीलदार मीना बाबर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, पंचायत समिती सदस्य हनमंत बोटे, पंचायत समिती सदस्य प्रसाद (राजूकाका ) जुगदर, पंचायत समिती सदस्य कोळी मॅडम, गटविकास अधिकारी योगेश कदम, सरपंच अजित दडस, सरपंच निलेश दडस यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, माण तालुक्यातील पदाधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, तालुक्यातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध
———————–
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनाने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत दिली. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत मंत्री गोरे म्हणाले की, राज्य शासनाने संवेदनशीलतेने दुष्काळ जाहीर करून उपाययोजनांना सुरुवात केली आहे. शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे आपली जनावरे कमी किमतीत विकून नुकसान करून घेऊ नये. शासकीय अधिकाऱ्यांनी जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. चारा आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यापेक्षा महत्त्वाचे दुसरे कोणतेही काम नाही. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहून जबाबदारी पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
औंध पाणीपुरवठा योजनेचे २० डिसेंबरला उद्घाटन
————————
औंध पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन दि. २० डिसेंबर रोजी घेण्याच्या सूचना देत मंत्री गोरे म्हणाले की, मार्डी पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. ट्रान्सफॉर्मरअभावी कोणत्याही गावाचा पाणीपुरवठा बंद राहू नये, यासाठी महावितरणने आवश्यक ठिकाणी चांगल्या दर्जाचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत. डीपी चोरीच्या घटना घडणाऱ्या भागात ग्रामस्थांनीही दक्षता घ्यावी. ट्रान्सफॉर्मरअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.
तालुका किंवा जिल्हा पातळीवर सरासरी नियोजन करण्याऐवजी प्रत्येक गावाच्या गरजेनुसार चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. ग्रामपातळीवर चारा उपलब्धता वाढवावी आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी गावनिहाय नियोजन करावे. आवश्यक ठिकाणी बंधारे व इतर जलप्रकल्पांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी. रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे सुरू करावीत. जलसंधारण विभागाने तलावांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घेऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
जलसंधारण आणि पाणी उपलब्धतेच्या कामांना प्राधान्य
——————————
बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, महावितरण, पशुसंवर्धन, जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण, मृद व जलसंधारण, सिंचन, लघुपाटबंधारे, रोजगार हमी योजना आणि जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना या विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच माण व खटाव तालुक्यांतील चारा आणि पाणी उपलब्धतेची सद्यस्थिती, पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांबाबतही चर्चा करण्यात आली.
दुष्काळाचा सामना करताना शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशुधन यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. प्रत्येक गावातील पाणी व चारा टंचाईचे प्रश्न तातडीने सोडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असा ठाम निर्धार यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
