लोहगाव

लोहगाव-वडगाव शिंदे येथे बांधकामस्थळी चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:



सुरक्षा साधनांशिवाय काम सुरू असल्याचा आरोप; ठेकेदाराविरुद्ध लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोहगाव  : वडगाव शिंदे येथील गुलाब हरी वस्ती परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून पडून एका ३९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २५ ऑगस्ट २०२६ रोजी घडली. बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून न दिल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शिंदे येथील गुलाब हरी वस्ती परिसरात संदीप विठ्ठल दिघे यांच्या मालकीच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी ठेकेदारामार्फत कामगारांकडून काम करून घेतले जात होते. मात्र, कामगारांच्या जीविताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले हेल्मेट, सुरक्षा जाळी, सेफ्टी बेल्ट यांसारखी सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या बांधकामस्थळी काम करणारे गजानन साहू (वय ३९, रा. गुलाब हरी वस्ती, वडगाव शिंदे रोड, हवेली, पुणे) हे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत लटकलेली लाकडी फळी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी फळीचा तोल गेल्याने ते चौथ्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या मांडीला आणि कमरेच्या मणक्याला गंभीर दुखापत होऊन हाडे फ्रॅक्चर झाली. या गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन उत्तम जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेची योग्य व्यवस्था होती का, तसेच आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आली होती का, याबाबत तपास केला जात आहे.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. इमारतींच्या बांधकामादरम्यान उंचावर काम करणाऱ्या मजुरांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविणे ही संबंधितांची जबाबदारी असताना अशा दुर्घटना घडत असल्याने बांधकामस्थळांवरील सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

error: Content is protected !!