बोपदेव घाटात भीषण अपघात; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघे जखमी
पुणे, ता. २५ : बोपदेव घाटात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला, तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटातून उताराने येणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच ०४ एफडी ७६५४) समोरून जात असलेल्या हुंडाई व्हेन्यू कारला (एमएच १२ वायएन ३२४७) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यालगत असलेल्या बसथांब्यावर जाऊन आदळले. त्यावेळी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टेम्पोची धडक बसली.
या दुर्घटनेत पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सिद्धेश राजे, विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी या तिघांचा मृत्यू झाला. तर श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत विद्यार्थ्यांपैकी सिद्धेश राजे यांच्यावर ससून रुग्णालयात, विशाल दांगडे यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक, वानवडी येथे, तर मोहिनी चौधरी यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. श्वेता तळेकर यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये, तर सोहम घंगाळे यांना इनामदार हॉस्पिटल, कोंढवा येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर पोलिसांनी आयशर टेम्पो आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे बोपदेव घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा आणि रस्त्यालगतच्या बसथांब्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
