छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी; सरकारचे स्पष्टीकरण
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “छावा”ऐतिहासिक चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे वास्तवदर्शी चित्रण, ऐतिहासिक संदर्भ आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
सिनेमाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, राज्यात २०१७ पासून करमणूक कर (एंटरटेनमेंट टॅक्स) रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे टॅक्स माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तथापि, छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी सरकार स्तरावर अधिक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि प्रमुख कलाकार विकी कौशल यांच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले आहे.हा चित्रपट प्रेक्षकांना ऐतिहासिक वारसा समजून घेण्यास मदत करेल, असे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
