हजेरी माळ येथील प्रतिसरकार क्रांतीस्तंभशिल्प गवताच्या विळख्यात
सातारा: खा. शरद पवार यांनी नुकतेच सातारा येथील ज्या हजेरी माळावरील प्रतिसरकार स्मारकातील सभागृहासाठी २५ लाख रुपये खासदार निधीतून मंजूर केले तोच संपूर्ण हजेरी माळ व तेथील प्रतिसरकार क्रांतीस्तंभ शिल्प पूर्णपणे वाळक्या गवताने वेढलेले आहे. व प्रशासन याबाबतीत ढिम्म आहे. स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांना क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारने सळो की पळो करून सोडले होते. १९४२ च्या चले जाओ स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात प्रतिसरकारने उल्लेखनीय कामगिरी पार पाडली होती. याच लढयाच्या सुवर्ण महोत्सव दिनानिमित्त तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी भारतात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात सातारा या ठिकाणी प्रतिसरकार स्मारकासाठी एक कोटी रुपये व भूखंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
या कामी तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी भूखंड व नियोजन समितीच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हाधिकारी रामस्वामी यांनी निधी उपलब्ध करून या निधीमधून सदर जागेचे कंपाऊंड व प्रतिसरकार क्रांतीस्तंभ शिल्प उभारण्यात आले.
आज सदरचे शिल्प व संपूर्ण हजेरी माळ गवताने वेढलेला असून सदर गवत पूर्णपणे वाळलेले असल्याने वणवा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर येथील मेन गेटची उंची कमी असल्याने व रात्री या ठिकाणी उभ्या असलेल्या खाजगी बसेसच्या आडून या जागेचा वापर मद्यपींकडून किंवा अनैतिक व्यवसायासाठी केला जावू शकतो. तरी संबंधीत विभागाने तात्काळ पावले उचलावीत.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या उल्लेखनीय कार्याची नोंद केंद्र सरकारने घेतली परंतु त्यांच्याच कर्मभूमीत शासनाच्या नाकर्तेपणामुळे सदरचे स्मारक गवताने वेढलेल्या अवस्थेत धुळखात पडले आहे.
