महत्त्वाच्या बातम्या

धोम धरणातून सोडलेले नियमबाह्य पाणी बंद करण्यासाठी ठिय्या आंदोलन 

सातारा : धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे -कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य सोडलेले पाणी तातडीने बंद करावे या मागणीसाठी मंगळवारी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने कृष्णानगर येथील सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या सिंचन भवना समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग केल्याने उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

    मंगळवारी कृष्णानगर येथील सिंचन भवनासमोर धोम धरण लाभक्षेत्राच्या सातारा, कोरेगाव, वाई, जावली तालुक्यातील शेतकरी एकत्र येऊन त्यांनी नियमबाह्य सोडलेले पाणी बंद करा, आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या, अशा घोषणा  सुरू केल्या.यावेळी सातारा सिंचन प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दुरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मिटींगला गेले असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सिंचन भवनासमोरच ठिय्या मांडला.

    यावेळी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजीत फाळके म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक कोयनानगर येथे झाली. त्यात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्यासमोर जिहे -कटापूर उपसा सिंचन योजनेबाबत चर्चा झाली.

    या चर्चेदरम्यान आम्ही तीव्र विरोध केलेला होता. त्यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी आम्हाला आपण मार्चमध्ये मुंबई येथे बैठक लावून त्यानंतर पाणी वाटपाबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केलेली नसून धोमच्या धरणातून जिहे -कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य पाणी सोडण्यात आलेले आहे.

    जिहे -कटापूर उपसा सिंचन योजना ही जून ते सप्टेंबर या चार  माही कालावधीतील असून ती पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यावर आहे. तर ते पाणी १४ ऑक्टोंबर पर्यंतच उपसा करण्याची तरतूद असून त्यानंतर या योजनेला नदी प्रवाहातून पाणी उपसण्यास पूर्ण बंदी आहे. असे असतानाही राजकीय हस्तक्षेप करून आमच्या हक्काचे पाणी कृष्णा नदीपात्रातून सोडल्यामुळे संपूर्ण धोम धरण लाभ क्षेत्रातील सिंचन व्यवस्था बाधित होणार आहे.

      आमच्या उभ्या पिकाचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत येणार आहे असे सांगून ते म्हणाले धोम प्रकल्प अहवाल व कृष्णा नदीवरील उपसा सिंचन योजना प्रकल्प अहवालानुसार अशा प्रकारे नदीपात्रात धरण साठ्यातून पाणी सोडण्याची कोणतीही तरतूद नाही. तरीही राजकीय बळाचा वापर करून नियमबाह्य पद्धतीने पाणी सोडल्याने धोम धरण लाभ क्षेत्रातील कोरेगाव, वाई जावली सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे याचा फटका मे महिन्यात बसणार असून शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळणार नाही.

    नियमबाह्य प्रस्तावाला विरोध करून आमच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बर्गे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, ऍड.श्रीकांत चव्हाण, नेताजी भोसले यांनी मनोगत व्यक्त करून धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे -कटापूर योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी मुळ प्रकल्पातील तरतुदींचा भंग करणारे आहे. याचा धोम धरण लाभक्षेत्रातील सिंचनावर परिणाम होणार असून जिहे -कटापूर उपसा सिंचन योजनेला रोमच्या धरणातून ०.५३ टीएमसी पाणी देण्याच्या कालवा सल्लागार समितीच्या मिटींगमधील ठरावाला धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा विरोध असल्याचे सांगितले.

     या आंदोलनात कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, संजय गायकवाड, माणिकराव भोसले, सुधाकर बर्गे, संतोष जाधव यांच्यासह धोम धरण लाभक्षेत्राच्या सातारा, कोरेगाव, वाई, जावली तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!