नाशिकमध्ये फरार गुन्हेगार कृष्णा आंधळे दिसल्याचा स्थानिकांचा दावा,पोलिस तपास सुरू
बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवरील दत्त मंदिर चौकात तो एका व्यक्तीसोबत दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, पोलिसांनी तपास अधिक गडद केला आहे. याआधीही जानेवारी महिन्यात कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा झाली होती, मात्र पोलिस तपासात त्याचे पुरावे हाती लागले नव्हते.
फरार असलेल्या कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक कार्यरत असून, त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. स्थानिकांच्या दाव्यांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चौकशीची प्रक्रिया वेगवान केली आहे.
