प्रामाणिकपणाचे दर्शन – दराडे कुटुंबियांचा अनुकरणीय आदर्श
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील नक्षत्र हॉटेलचे मालक भिकाजी दराडे आणि त्यांची नात संस्कृती दराडे यांनी प्रामाणिकपणाचा उत्तम आदर्श घालून दिला. हॉटेलमध्ये विसरलेली तब्बल 85 हजार रुपये रोख आणि मौल्यवान दागिने असलेली बॅग त्यांनी संबंधित प्रवाशांपर्यंत सुरक्षित परत केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील मर्ढे येथील निवृत्त शिक्षक जगन्नाथ शिंगटे आणि त्यांची पत्नी पार्वती शिंगटे हे अयोध्या यात्रेसाठी रामेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान चहा पिण्यासाठी बस तळेगाव येथील नक्षत्र हॉटेल येथे थांबली. चहा घेतल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासासाठी रवाना झाले, मात्र शिंगटे दांपत्य आपली रोख रक्कम आणि दागिन्यांची बॅग हॉटेलमधील टेबलवर विसरले.
नक्षत्र हॉटेलच्या संस्कृती दराडे हिने टेबलवर विसरलेली बॅग पाहिली आणि तिने तात्काळ आजोबा भिकाजी दराडे यांना याबाबत माहिती दिली. बॅग तपासल्यानंतर त्यात 85,000 रुपये रोख आणि काही मौल्यवान दागिने असल्याचे आढळले.
क्षणाचाही विलंब न करता भिकाजी दराडे यांनी बॅगमधील ज्वेलर्सच्या पावत्या पाहून त्या दुकानाच्या माध्यमातून शिंगटे कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. शिंगटे कुटुंबीय त्या वेळी भोरस फाटा, चाळीसगाव येथे रात्रीच्या जेवणासाठी थांबले होते. दराडे यांनी तिथे जाऊन बॅग स्वतः त्यांच्या हातात सुपूर्त केली.
संपत्ती मिळवण्यासाठी शॉर्टकट्स शोधणाऱ्या युगातही माणूसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दर्शन या घटनेतून घडले. शिंगटे कुटुंबीयांनी भिकाजी दराडे आणि संस्कृती दराडे यांचा सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले.
“आम्ही बॅग हरवली हे लक्षात आल्यावर खूप टेन्शन आले, मात्र काही वेळातच भिकाजी दराडे यांनी आम्हाला फोन करून वस्तू सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत,” असे जगन्नाथ शिंगटे यांनी भावनिक शब्दांत सांगितले.तर भिकाजी दराडे म्हणाले, “कष्टाने मिळवलेली संपत्ती हीच खरी सुखाची असते. आयुष्यात सदैव चांगली कर्मे करावी हीच आमची शिकवण आहे.”
या संपूर्ण घटनेने नक्षत्र हॉटेलचे मालक आणि त्यांच्या नातीच्या प्रामाणिकतेचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
