शाळेची भिंत कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू ; 2 जण जखमी
गेल्या आठवड्याभरात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली आहे. यातच मुंबई तील कल्याण मध्ये शाळेची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील श्री कृपा चाळ परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. के.बी. के इंटरनॅशनल शाळेची भिंतीजवळ काही मुलं खेळत होती. अचानक शाळेची भिंत मुलांवर कोसळली.भिंतीच्या ढिगाऱ्याखाली तीन मुले अडकली होती. यामध्ये एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. भिंत कोसळलेली पाहून स्थानिकांनी घटना स्थळी धाव घेतली व मातीचा ढिगारा बाजूला करून मुलांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. तीनही मुलांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु यात एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.अंश राजकुमार सिंह असे ११ वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. तर दोन मुलं जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अंश सिंह च्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
शाळा मालकाचा हलगर्जी पणा
स्थानिकांनी शाळेकडे भिंत दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र मुजोर शाळा मालकाने याकडे दुर्लक्ष केले व त्यामुळे आज मोठी दुर्घटना घडली. शाळेची भिंत अंगावर कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला. घटना स्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली तसेच पोलीसांनी देखील घटना स्थळाकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
