पतीनेच पत्नीचे काढले अंघोळ करतानाचे व्हिडीओ ; EMI साठी करत होता ब्लॅकमेल
पुणे: पुण्यातील आंबेगाव येथून एक आश्चर्यजनक बाब समोर आली आहे. पतीनेच स्वतःच्या पत्नीचे खाजगी व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केले आहे. या प्रकरणी
पीडिते महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी पतीने स्वतःच्याच घरात आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसविले होते. पत्नीचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला पैशासाठी ब्लॅकमेल करू लागला. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी पतीसह सासरच्या सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, पतीने घर आणि गाडीचा हप्ता चुकविण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणण्यासाठी छळ केला, असा आरोप पत्नीने केला आहे. पीडित महिलेचे 2020 साली लग्न झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला, असे पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. महिलेने तक्रारीत शिवीगाळ आणि मारहाण करून माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावाही केला आहे. संबंधित तक्रारदार महिला आणि तिचा पती शासकीय नोकरदार असल्याचे सांगितले जाते.
