पुण्यात आणखी एक भूखंड घोटाळा समोर; 26 जणांवर गुन्हा दाखल
पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्यातील राजकारण तापले असताना आता पुण्यात आणखी एक घोटाळा समोर आला आहे.पुणे जिल्ह्यातील राज्य पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या १५ एकर जागेची नियमांचे उल्लंघन करून विक्री करण्यात आल्याच्या आरोपावरून पोलिसांनी निलंबित महिला उपनिबंधकासह २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पिंपरी चिंचवड येथील ताथवडे परिसरात असलेली ही जमीन अहस्तांतरणीय म्हणून वर्गीकृत असूनही ३३ कोटी रुपयांना विकण्यात आल्याचे वृत्त आहे.ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील हवेली सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुण्याजवळील मौजे ताथवडे, ता. मुळशी येथील सर्व्हे क्र. २० मधील एकूण ६ हे ३२ आर जमिनीच्या खरेदीखत दस्त क्र. ६८५/२०२५ च्या नोंदणीत ही अनियमितता आढळली. नोंदणी महानिरीक्षकांनी (IGR) यापूर्वी हवेली क्रमांक १७ येथील वरिष्ठ लिपिक आणि प्रभारी उपनिरीक्षक (वर्ग II) विद्या शंकर बडे (सांगले) यांना निलंबित केले होते.अधिकाऱ्याने सांगितले की, विक्री करार ९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आला होता आणि तो महसूल किंवा पशुसंवर्धन विभागाच्या मंजुरीशिवाय करण्यात आला होता. नोंदणी आणि मुद्रांक उपनिरीक्षक आणि जिल्हा निबंधक यांच्या संयुक्त चौकशीत असे आढळून आले की जमीन हस्तांतरणावर स्पष्ट निर्बंध असूनही तिने विक्री कराराची नोंदणी केली होती, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षकाना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.
