पुण्याच्या जुबेर हंगरगेकरच्या मोबाईल मध्ये सापडले पाकिस्तानी नंबर ; लॅपटॉप मध्ये देखील 1 टीबी पेक्षा जास्त डेटा
दिल्लीच्या लाल किल्ला येथे बॉम्ब स्फोट झाल्या नंतर पुण्यातून एकास एटीएसने ताब्यात घेतले आहे. दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आले होते. जुबेर हंगरगेकर असे त्याचे नाव असून तो संगणक अभियंता आहे. दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या हंगरगेकरला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुणे रेल्वे स्थानक परिसरातून नुकतीच अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर हंगरगेकर याच्या लॅपटॉपमध्ये १ टीबीपेक्षा अधिक डेटा असल्याचे ‘एटीएस’च्या तपासात पुढे आले आहे. ‘एटीएस’च्या कारवाईनंतर तो चेन्नईला गेला होता. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. जुबेरकडून मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्यात पाकिस्तानी क्रमांक सापडला आहे. त्याच्याकडून लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, मोबाइल, लॅपटॉपची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. तांत्रिक विश्लेषणातून त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात येणार आहे. जुबेरच्या बँक खात्याची तपासणी करण्यात येत आहे. त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. मोबाइलमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, ओमानमधील काही जणांचे क्रमांक सापडले आहेत.
जुबेरच्या संपर्कात असलेल्या १८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. काही जणांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा एक साथीदार शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला आहे. ‘एटीएस’ने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. जुबेर हा मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश के. एन. शिंदे यांनी शुक्रवारी दिले आहेत.
