महत्त्वाच्या बातम्या

आंधळी येथे पशुधन आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

दहिवडी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत आंधळी व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–२, मलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्गत पशुरोग निदान, वंध्यत्व निवारण व जंतनिर्मूलन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये गावातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान गाई-म्हशी तसेच इतर पाळीव जनावरांची सखोल तपासणी करून अंतर्गत आजारांचे निदान, वंध्यत्व समस्यांवर उपचार तसेच जंतनिर्मूलनासाठी आवश्यक औषधोपचार मोफत करण्यात आले.यावेळी पशुपालकांना जनावरांचे आरोग्य, संतुलित पोषण, वेळेवर लसीकरण व स्वच्छता याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमामुळे जनावरांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

     या शिबिराच्या माध्यमातून पशुधन आरोग्य सुधारण्याबरोबरच कृषीपूरक व्यवसाय बळकट करण्याचा महत्त्वाचा उद्देश साध्य होत आहे. या शिबिराचे उद्घाटन मा. उपसरपंच सौं. सविता खरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंधळी गावचे ज्येष्ठ नेते अर्जुन (तात्या) काळे, आदर्श सरपंच दादासाहेब काळे, माजी सैनिक दत्तात्रय भोसले, दत्तात्रय काळे, शरद काळे, दिपक शिंगाडे, संतोष नामदास, अनिल खरात, धनाजी काळे, मनीषा शेंडे, सोमनाथ कुंभार, नवनाथ नामदास उपस्थित होते. तसेच डॉ. एस. एस. मोरे (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, मलवडी)  शिवाजी आटोळे (पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना बिजवडी),  नामदास (पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना महिमानगड) डॉ. मोनीश खरात यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थित शेतकरी व पशुपालकांनी या उपयुक्त शिबिराबद्दल समाधान व्यक्त करून शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मनःपूर्वक कौतुक केले. अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे आंधळी गाव खऱ्या अर्थाने कृषीसंपन्न व समृद्ध गाव म्हणून पुढे जात असल्याच चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!